मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरूणाने १७ फेब्रुवारीला त्याच्या ट्वीटर खात्यावरून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. या ट्विटमध्ये तरूणाने लिहिले होते की, “मी आत्महत्या करत आहे. त्याआधी मला माझे अवयव दान करायचे आहेत. मी लहानपणीच ठरवले होते की, मृत्युपूर्वी माझे अवयव दान करेल. माझ्या करिअरमधील सततच्या अपयशामुळे आत्महत्या करीत आहे.” मुंबई पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब या तरूणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तरुण सातत्याने आपले लोकेशन बदलत असल्याने पोलिसांना त्याला शोधण्यात अडचण येत होत्या. मात्र, पोलिसांनी आपले कार्य थांबवले नाही आणि संपूर्ण रात्रभर तरूणाचा शोध सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी या तरूणाला कर्जत रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेऊन त्याला आत्महत्येपासून परावृत केले. मुंबई पोलीसांच्या या कार्याचे कौतूक होत आहे.