महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना ‘प्रॉम्प्ट पेमेंट’चा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे. गो-ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.