शिंदे गटाने शिवसेनेच्या संसदीय गटनेतेपदावरुन संजय राऊत यांना हटवण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांच्या ऐवजी नुकतेच शिंदे गटात सामील झालेले खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र संसदेच्या संबंधित समितीला दिले असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. लोकसभेत शिंदे गटाकडे १३ खासदार आहेत. तर, ५ खासदार ठाकरे यांच्या बाजूने आहेत. राज्यसभेतील तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत. यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई आणि प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. आता, संसदीय नेता बदलल्यास ठाकरे गटाच्या खासदारांना शिंदे गटाचा व्हीप मानवा लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे म्हटले जात आहे.