विधानपरिषदेतही राऊत यांच्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. संजय राऊत यांना अटक करा, अशी मागणी विधानपरिषदेत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केली. राऊत यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसलो तरी त्यांनी कोणत्या परिप्रेक्ष्यात हे वक्तव्य केलं, याची माहिती घेणं आवश्यक असल्याचं मत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं. राऊत यांना अटक करायची की नाही याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं विधानपरिषदेच्या उपसभापती यांनी सत्ताधारी आमदारांना सांगितलं. परंतु सत्ताधारी आमदारांचं समाधान न झाल्याने गोंधळ सुरूच राहिल्याने उपसभापतींनी दिवसभरासाठी विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करत असल्याचं जाहीर केलं.