विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक भूमिकेत दिसले. विधीमंडळाचे कामकाज सुरू होण्याच्या आधीच विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर दरवाढीविरोधात आंदोलन केले. दरम्यान, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. नाहीतर, खुर्च्या खाली करा, असा टोलाही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा वीज देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे, असे म्हणत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.