कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला. परंतु, याच दिवसाला अनेक जण ‘मराठी राजभाषा दिन’ असेही म्हणतात. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने १० एप्रिल १९९७ रोजी काढलेल्या परिपत्रकात १ मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसा तो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून १ मे रोजी साजरा करण्यात येत होता. परंतु, कालांतराने तो विस्मृतीत गेला. त्यामुळे १९९७ ला शासनाला पुन्हा परिपत्रक काढावं लागलं.