दोन वर्षापूर्वी कामावर असताना नारायण यांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर युवराजच्या आई रत्ना यांचे आयुष्यच बदलले. तिला नैराश्य एवढे आले की, दिवस रात्र ती पतीच्या विचारात असायची. पती निधनानंतर रत्नाला भावकीत आणि समाजात वेगळी वागणूक मिळताना मुलगा पाहत होता. सतत दु:खात वावरायची. तिचं हे दु:ख व एकटेपणा युवराजला पाहवेना. वयाच्या ४५व्या वर्षी आई विधवा झाली होती. हे सारं पाहून युवराजने आईचे दुसरं लग्न लावण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. आईसाठी वर संशोधन सुरू केल्यानंतर त्याला नात्यातच एक शेतकरी व्यक्ती आईसाठी योग्य साथीदार वाटला. त्याने पुढची बोलणी सुरू केली व आईच्या नकाराला होकारात बदलले.
मुलाच्या हट्टापुढे आई लग्नासाठी तयार झाली तिने ही गोष्ट नातेवाईक व शेजाऱ्यांच्याही कानावर घातली. तिला पुनर्विवाहासाठी सर्वांची संमती व समर्थन मिळाले. आणि चार दिवसापूर्वी मोजके पै-पाहुणे व शेजाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. युवराजला नवीन वडिल तर आईला जीवनाचा नवा साथीदार मिळाला.