पुण्यात विश्रांतवाडी येथील फुलेनगर येथील आरटीओ कार्यालयात जप्त करण्यात आलेली वाहने ठेवली आहेत. यात अनेक लक्झरी बस, डंपर आणि टेम्पो ठेवलेले आहेत. दरम्यान, रविवारी दुपारी अचानक आवारात उभ्या असलेल्या बसने पेट घेतला. पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केले. काही वेळात आवारातील ०४ कार, ०४ लक्झरी बस, ०१ टेम्पो व ०१ डंपर अशी एकूण १० वाहनांनी देखील पेट घेतला. यांची माहिती अग्निशामक दलाला मिळताच तातडीने १ टँकर आणि ३ बंबांच्या साह्याने कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्न करत होते. काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, पोलिस घटनास्थळी आले असून पंचनामा सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली असावी याचा अंदाज पोलिस घेत आहेत.